न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२०) :- महापालिकेतील वर्ग एक ते तीनच्या कर्मचा-यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात अदा करण्याबाबत आदेश काढले होते. त्यानुसार सर्व कर्मचा-यांची पगार कपात होणे आवश्यक असताना वायसीएममधील सर्वच हंगामी डॉक्टर प्राध्यापकांचे पगार एकरकमी म्हणजेच १०० टक्के अदा केले आहेत. यांचे वेतन प्रत्येकी एक लाखांपेक्षाही अधिक आहे. ही बाब अतिशय निराशाजनक आहे.
महापालिकेचे वायसीएममधील डॉक्टर १४ तास काम करत आहेत. यामध्ये हंगामी डॉक्टरांचा अत्यंत अल्प सहभाग आहे, असे असताना त्यांना एकरकमी म्हणजेच १०० टक्के वेतन अदा करुन महापालिकेतील कर्मचा-यांमध्ये भेदभाव निर्माण केला आहे. यामुळे कर्मचा-यांमध्ये असंतोष असून त्याचा कधीही उद्रेक होऊ शकतो.
याचा त्यांच्या कामकाजावर विपरीत परीणाम होत आहे. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रोत्साहन भत्ता त्वरित लागू करावा. महापालिकेतील सर्वच कर्मचा-यांचे मार्च महिन्याचे दुस-या टप्प्यातील वेतन त्वरित अदा करावे, अशी विनंती महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आणि महासचिव सुप्रिया सुरगुडे-जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


















