- पश्चिम भागात केवळ १३ टक्केच कोरोनाग्रस्त तर, पूर्व भागात ८७ टक्के…
- पश्चिम भाग काहीअंशी सुरक्षित राहण्यासाठी आयुक्तांनी पाऊले उचलावीत – विजय पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात सद्यस्थितीत कोविड १९ या कोरोना विषाणू ची लागण ६२ जणांना झालेली आहे. दोन जणांचा दुर्दैवी बळी सुद्धा गेलेला आहे. पुढील काही काळात हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. “कम्युनिटी स्प्रेड ” ही तिसरी स्टेज रोखण्यासाठी प्रशासन मोठे परिश्रम करीत आहे. परंतु, अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्स चे पालन होताना दिसून येत नाही. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यावर वाहनांची संख्याही वाढलेली दिसून येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्री मुळे मंडई मध्ये गर्दी होताना दिसून येत आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर लॉक डाऊन चे काटेकोर पालन होताना मात्र दिसून येत नाही. याकरिता महापालिका आयुक्तांनी मात्र कडक भूमिका घेणे आवश्यक आहे. नुसते शहर सील करून उपयोग नाही तर शहराचे दोन भाग म्हणजेच पूर्व व पश्चिम हे तातडीने अलग करून. पूर्व भागातील कोणत्याही रहिवाशी व प्रवाशी व्यक्तीनां पश्चिम भागामध्ये प्रवेशबंदी करावी. तरच कोरोनाचे संक्रमण थांबवता येईल, अन्यथा पूर्व भागातील संक्रमण पश्चिम भागात पोहचण्यास वेळ लागणार नाही.
भौगोलिक रचनेचा अभ्यास केला असता. पाच झोन (अ,ब,ड,ज,ह) हे मुंबई पुणे रस्त्याच्या पश्चिम बाजूस येतात. किवळे, रावेत,मामुर्डी, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर,चिंचवडेनगर,गुरुद्वारा परिसर,चिंचवड गाव, वाकड, पुनवळे,थेरगाव,काळेवाडी,पिंपरी,रहाटणी, आकुर्डी,दत्तवाडी,विठ्ठलवाडी,निगडी पश्चिम,कासारवाडी,सांगवी,फुगेवाडी, दापोडी,पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, असा तो परिसर असून सध्या या भागात कोविड १९ चे ८ रुग्ण म्हणजेच एकूण संख्येच्या तुलनेत १३ टक्के आहे. उर्वरित ५४ रुग्ण हे पूर्व भागातील आहेत म्हणजेच काय तर मुंबई पुणे रोडच्या पलीकडील असलेल्या भागातील रुग्णांची संख्या ८७ टक्केपेक्षा जास्त आहे.
पूर्व भागात क,इ,फ असे तीन झोन येतात यामध्ये रुपीनगर, ओटा स्कीम, साईनाथनगर निगडीपूर्व, त्रिवेणीनगर, तळवडे, इंद्रायनींनगर, चिखली, खराळवाडी, मोशी, भोसरी,दिघी,चऱ्होली,बोपखेल, शाहूनगर,संभाजीनगर हे प्रमुख उपनगरे समाविष्ट होतात. लोकसंख्येचा अंदाजे विचार केला तर पूर्व भागात १६ लाख व पश्चिम भागात १२ लाख लोकसंख्या आहे. त्याचप्रमाणे शहरातील १६ लाख लोकांचे आरोग्य सर्वेक्षणही अद्याप बाकी आहे. असे असताना पिंपरी चिंचवड शहरातील पूर्व भागात कोरोनाचा प्रकोप सद्यस्थितीत वाढत आहे. त्यामुळे सदरचा पूर्व भाग पश्चिम भागाशी एकत्रित न होण्यासाठी काही कठोर उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरते. शहराचे दोन भागात विलीगिकरणं करणे आवश्यक ठरते. व ते सहज शक्यही आहे.
सुदैवाने भोगोलिक रचनेनुसार मुंबई पुणे महामार्ग हा पूर्व व पश्चिम भागाच्या मध्यातून जात असल्याने शहराचे विलीगीकरण दोन भागात म्हणजेच पूर्व आणि पश्चिम भागात सहज रित्या होते, सदरचा महामार्ग काटेकोरपणे सिल केल्यास.पश्चिम भागातील १२ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या विलग होईल व येत्या १० दिवसातील लॉकडाऊन च्या काळात कोरोनास प्रतिबंध बऱ्यापैकी घालता येईल व पश्चिम भाग काहीअंशी सुरक्षित राहील यात शंका नाही.
सोशल डिस्टन्सिंग चे पालन सध्या होत नसल्याने असा कठोर निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरते. आजच्या तारखेचा (२०.०४.२०१९) विचार केला असता पिंपरी चिंचवड शहराच्या पश्चिम भागातील लाखो रहिवाशी असलेला मोठा भाग हा पूर्णपणे कोविड १९ मुक्त आहे. ते रहिवाशी सुरक्षित राहण्यासाठी काही पावले तातडीने शहर आयुक्तांनी उचलावीत, अशी मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.


















