- खरा विनाश तर अजून दिसायचा बाकी, जागतिक आरोग्य संघटनेने दिला धोक्याचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२०) :- जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात अद्यापही वाढतच आहे. मागील चोवीस तासांत देशभरात कोरनाने ४७ जणांचा बळी घेतला असून, १ हजार ३३६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर देशातील एकूण करोनाची रुग्ण संख्या १८ हजार ३३६ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले १४ हजार ७५९, रुग्णालायतून उपचारानंतर घरी पाठण्यात आलेले ३ हजार २५२ व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ५९० जणांचा समावेश आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ८० टक्के रूग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाहीत.
जगात करोनाने आतापर्यंत १,६६१२२ बळी घेतले असून एकूण रुग्णांची संख्या २४,२६७८९ झाली आहे. एकूण १९३ देशात विषाणूचा प्रसार झाला असून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ६३६७०२ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना व एएफपी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही संख्या देण्यात आली असून संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या जास्तच असण्याची शक्यता आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी खरा विनाश तर अजून दिसायचाय असं सांगत धोक्याचा इशारा दिला आहे. करोनाचा प्रभाव अद्यापही कमी झाला नसताना अनेक देश निर्बंध शिथील करत असल्याच्या पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी हा इशारा दिला आहे. टेड्रोस यांनी यावेळी जगभरात जवळपास १ लाख ६६ हजारांहून जास्त जणांचा बळी घेणारा करोना व्हायरसचा प्रादुर्भाव का वाढेल याचं कोणतंही ठाम कारण सांगितलं नाही.


















