- आमदार महेश लांडगे यांचे शहरातील दानशूरांना आवाहन..
- पांडाभाऊ साने युवा मंचच्या वतीने चिखलीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२०) :- राज्यभरात कोरोना संकट गडद होत आहे. त्याचे प्रत्यक्ष लोन पिंपरी चिंचवड शहरावर घोंगावत आहे. त्यातच शासनाचे लॉकडाऊन आणि संचारबंदी यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे, हातावरील पोट असणाऱ्या कामगार, मजूर, निराधार लोकांचे भयंकर हाल होत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील चिखली-मोरेवस्ती परिसरात तर, अशा नागरिकांचेच सर्वाधिक वास्तव्य आहे. लॉक डाऊनमुळे हाताला काम नाही, पैसे संपलेले, तेल, मीठ आणि घरात होतं नव्हतं ते संपल्याने ही लोकं दिशाहीन झाली आहेत. राज्यासकट, परप्रांतातील कामानिमित्त स्थिरावलेली बिऱ्हाड यांची परिस्थिती तर खूपच हलाखीची बनली आहे. कोणी नगरसेवकाच्या दारात तर कोणी सामाजिक कार्यकर्त्याच्या दारात तर कोणी त्यांच्या गावातील सरपंचाला तर कोणी आमदारांना मदतीसाठी विनवणी करताना दिसत आहेत. मात्र, खात्रीशीर मदत मिळेलच, याची शाश्वती नाही. अशी वेळ कुणा वैऱ्यावर देखील येऊ नये. हे चित्र पाहून भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली-मोरेवस्ती परिसरातील स्थानिक तथा भाजपचे युवा नेते पांडाभाऊ साने त्यांच्या मदतीला सरसावले आहेत.
तसेच साने यांना चिखली-मोरेवस्ती परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मजुरांच्या, कामगारांच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी, गावातील सरपंच, महापालिकेचे नगरसेवक व इतर समाजसेवकांनी लोकांना मदत व्हावी, यासाठी संपर्क साधला आहे. अशाच मदतीसाठी साने यांना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर लोणार मतदारसंघांचे शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर, तसेच औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील चिखली-मोरेवस्तीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू तथा आर्थिक मदत व्हावी, याबाबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, विनंती केली आहे.
पांडाभाऊ साने यांनी पुढाकार घेऊन, चिखलीतील पांडाभाऊ साने युवा मंचच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने गहू, तांदुळ, डाळ, तेल, मीठ, मिरची, मसाले, व आदी जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली. पाच, दोन, एक किलोप्रमाणे एक-एक किट तयार केले. त्या कीटचे चिखली, मोरेवस्ती परिसर तसेच झेंडा चौक येथे आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते वंचित लोकांना वाटप केले. हे करीत असताना लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक सुचेनेचे पालन करण्यास सांगून, सामाजिक सुरक्षित अंतर राखण्याबाबत सूचना केल्या. तसेच परिसर निर्जंतुक केला. साधारणतः परिसरातील दोन ते अडीच हजार लोकांना या जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. तसेच ते पिंपरी चिंचवड शहरात कंटेनमेंट झोन लागू झाल्यामुळे गरजूंना घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोच करणार आहेत.
आमदार महेशदादा लांडगे म्हणाले की, देशात कोरोना आजार फैलावत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभर लॉकडाऊन लागू केले आहे. नागरिक घरातच अडकून पडले आहेत. समाजातील वंचित घटकांची अवस्था बिकट आहे. जवळचे पैसे संपल्याने दोन वेळचे जेवण मिळणे त्यांना अवघड होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत समाजातील या गोरगरीब बांधवाकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. या असंघटीत बांधवांच्या हिताचा विचार करीत, त्यांच्यासाठी झटणाऱ्या, त्यांच्या परिस्थितीची जाणीव असणाऱ्या असणाऱ्या पांडाभाऊंचा इतरांनी देखील आदर्श घेऊन, अशा कठीण परीस्थितीत सामाजिक भावनेच्या माध्यमातून गोर-गरिबांना मदतीचे सहकार्य करावे.
पांडाभाऊ साने म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यात देखील याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कामगार, कष्टकरी बांधवांवर यामुळे आभाळ कोसळले आहे. अशा परिस्थितीत पांडाभाऊ साने युवा मंच परिस्थितीशी लढा देत, नागरिकांच्या मदतीकरिता सज्ज आहे. प्रभाग १ मधील चिखली-मोरेवस्ती परिसरातील कामगार, कष्टकरी तसेच अडलेल्या-नडलेल्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. तसेच कोरोनामुळे दुकानदार, कामगारांचे कामही बंद झाले आहे. त्यामुळे मी माझ्या मालकीच्या सदनिका, दुकान गाळे, व भाडेकरुंकडून भाडे न आकारण्याचा सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला. तसेच प्रभागातील नागरिकांसाठी स्वखर्चातून मोफत ‘ मास्क व सॅनिटायझर ’ चे वाटप घरपोच सुरु केले. ते आजही सुरु आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रभागातील परिसरात स्व-खर्चातून सॅनेटराइज (सोडियम हायपोक्लोराईट व बॅक्टोडेक्स औषध) कोरोना विषाणु जंतुनाशक फवारणीही केली आहे. वेगवेगळ्या स्तरावर प्रभागात जनजागृतीचे काम सुरु आहे.
नागरिकांनी देखील कोणत्याही मदतीची गरज भासल्यास जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. पोलिसांना सहकार्य करावे. महापालिकेने वारंवार केलेल्या सूचनांनुसार घरी राहून, स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही युवा नेते पांडाभाऊ साने यांनी यावेळी प्रभागातील नागरिकांना केले.


















