- आज नव्याने तीन रुग्णांची भर; तर पुण्यातील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू
- तर, आज आणखी दोन रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाबतची स्थिती आज बुधवारी ‘कही ख़ुशी कही गम’ अशी दिसून आली. आज नव्याने शहरात आणखी तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन महिला आणि एका पुरुषाचा त्यात समावेश आहे. दोन्ही महिलांचे वय अनुक्रमे ४०, ४५ असून पुरुषाचे वय ५० असे आहे. अहवाल सकारात्मक आलेले हे रुग्ण दापोडी, वाकड व पुण्यातील मार्केटयार्ड-गुलटेकडी या परिसरातील आहेत.
तसेच, आज एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत झालेली ही महिला मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे येथे राहणारी होती. ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार घेत होती. उपचारादरम्यान आज तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत शहरातील मृत रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे.
आज थेरगाव आणि खराळवाडी येथील रहिवाशी असणारे २ कोरोनाबाधित रुग्णांच्या १४ दिवसानंतरच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यामुळे आज बुधवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे.
दरम्यान शहरातील करोना बाधितांची संख्या ६७ वर पोहचली असून, सक्रीय रुग्णांची संख्या ४७ वर गेली आहे. एकूण २० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ३६ रुग्ण दाखल आहेत.


















