न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२०) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यामध्ये महसुलाचा ओघ सुरु करण्याच्या दृष्टीने राज्यातील ‘वाईन शॉप्स’ सुरु करायला काय हरकत आहे? असा सवाल केला आहे.
राज यांनी उद्धव यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राज्याचे अर्थचक्र पुन्हा सुरु करण्यासंदर्भातील काही मुद्दे उपस्थित केले आहेत. यामध्ये त्यांनी हॉटेलबरोबरच ‘वाईन शॉप्स’ सुरु करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने विचार करावा अशी मागणी राज यांनी केली आहे.
‘वाईन शॉप्स’तून मिळणारा महसूल हा मोठा आहे आणि आत्ता राज्याला त्याची नितांत गरज असल्याचेही राज यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे. “आज पोलिसांपासून ते आरोग्य सेवक, नर्सेस ह्या अनेकांकडे पीपीई किट्स नाहीत, लोकांना मोफत जेवण किंवा इतर काही पुरवायचं म्हणलं तर ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात करत राज्य सरकार दिवस ढकलतंय कारण त्यांची तिजोरी पण साफ झाली आहे. अगदी सरकारी कर्मचारी वर्गाला पगार द्यायलाही पैसे नाहीत ही परिस्थिती आहे. त्यामुळे ‘वाईन शॉप्स’तून मिळणारा महसूल हा मोठा आहे आणि आत्ता राज्याला त्याची नितांत गरज आहे,” असं या पत्रात राज यांनी नमूद केलं आहे.


















