न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२०) :- सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोना (कोविड – १९) या विषाणूने थैमान घातले आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत देशात कोरोनाचा फ़ैलाव वेग अद्याप नियंत्रित आहे. परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यात इतर राज्याच्या तुलनेत या रोगाचा फ़ैलाव वेगाने होत आहे. पुणे विभागात या विषाणूचे बाधित रुग्ण १००० च्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. आपल्या पिंपरी चिंचवड शहरात ही बाधितांची संख्या ६८ झाली आहे. या महामारीच्या रोकधामीकरिता समाजातील सर्व स्तरावर विविध उपाय करण्याचे प्रयत्न वायू वेगाने सुरू आहेत. त्या प्रयत्नातूनच देशात व महाराष्ट्रात मनुष्य बाह्य शरीर निर्जंतुकीकरण होण्यासाठी ‘सॅनिटायझेशन टनेल’ ची अभिनव कल्पना पुढे आली.
आपल्या महापालिका परिसरातही असे टनेल नुकतेच बसविण्यात आले. नगरसदस्यांचा हा नक्कीच प्रामाणिक प्रयत्न होता. परंतु आता असे टनेल केमिकल फवारणीमुळे वादात अडकले आहेत. (डब्लू. एच.ओ) म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने अश्या टनेल मध्ये फवारणीसाठी वापरण्यात येणारे “सोडियम हायपोक्लोराईट” हे द्रव्य शरीरासाठी घातक आहे हे स्पष्ट केले आहे. या द्रव्य फवारणीबरोबरच इतर सोल्युशन म्हणजेच अल्कोहोल, क्लोरीन हे सुद्धा शरीरास इजा पोहचवू शकतात असे नमूद केले आहे.
या टनेल च्या रसायन फवारणीमुळे डोळे लाल होणे, चुरचुरने, त्वचेला खाज सुटणे, त्वचा कोरडी होणे, श्वास घेण्यास अडचण निर्माण होणे अश्या शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे राज्यात ठिकठिकानी उभ्या केलेल्या व लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या टनेलचे आता करायचे काय ? असा प्रश्न अनेक उत्पादक, समाजसेवी व्यक्ती, नगरसदस्य यांच्यापुढे उभा राहिला आहे. परंतु टनेल ही मुख्य अडचण नसून सॅनिटायझेशन फवारणी करिता वापरण्यात येणारे केमिकल सोल्युशन हेच अडथळा ठरले आहे. हे द्रव्य जर आयुर्वेदिक द्रव्यामध्ये बदलले तर “सॅनिटायझेशन टनेल” चा मुख्य उद्देश नक्कीच सफल होईल.
भारत सरकारच्या “आयुष” विभागानेसुद्धा आयुर्वेदिक उपायांना प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे आता माणसांवर अशी केमिकल फवारणी न करता आयुर्वेदीक मिश्रणाची फवारणी करावी. ४००० वर्षांपासून भारतीय आयुर्वेदात महर्षी आचार्य श्री चरक, निघंटू, पाराशर यांनीही कडुलिंब पाने, तुळशी पाने व लिंबू यांचे महत्व विशद केले आहे. कडुलिंबाच्या पानात अँटीऑक्सिडेंट, बॅक्टरीया विरोधी अँटीसेफ्टीक गुण असतात तसेच सी व्हिटॅमिनने भरपूर असलेले लिंबू,आवळा यांच्या रसाचाही काही प्रमाणात उपयोग करता येईल. आरोग्यदायी तुळसी रसाचाही वापर करता येईल. या आयुर्वेदिक फवारणी द्रव्यामुळे शारीरीक आरोग्यास कोणताही घातक दुष्परिणाम भोगावा लागणार नाही व कोरोना विरोधाची लढाई लढण्यास बळही मिळेल. त्यामुळे आता प्रशासकीय कर्मचारी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य असे आरोग्यदायी टनेल चा वापर आयुवेदीक द्रव्यामुळे सुरू राहू शकेल, अशी माहिती प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली आहे.















