न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवडसह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असल्याने शासनाने जिल्हाबंदी केली आहे. इतर जिल्ह्यात जायचे झाल्यास पोलिसांकडे पाससाठी अर्ज करावा लागतो. अत्यंत तातडीच्या कारणासाठी आंतरजिल्हा प्रवासाकरिता पोलिसांकडून ई-पासची सोय देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पासकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागत आहे. मात्र हा पास सहजासहजी मिळत नाही. पास अत्यावश्यक कारणासाठी आहे, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, अत्यावश्यक कारणासाठीच पासची मागणी होत असतानाही पोलिसांकडून पास दिला जात नाही.
अगदी असाच अनुभव वाल्हेकरवाडी येथे राहणाऱ्या रवींद्र महाजन यांच्या कुटुंबियांवर आला. रवींद्र यांचे वडील जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामधील उत्रान या गावी गंभीर आजारी होते. त्यांचा मुलगा असल्याने त्यांना त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी गावी जायचे होते. त्यांनी पोलिसांकडे पाससाठी अर्ज केला मात्र, हे आवश्यक कारण नाही, असे उत्तर पोलीस प्रशासनकडून देण्यात आले. त्यामुळे, महाजन यांच्यासह त्यांची पत्नी, लहान मुलगी, वहिनी आणि पुतण्या हे सर्वजण राहत्या घरीच अडकून पडले. अखेर प्रकृती खालावल्याने रविवारी पहाटे अडीच वाजता त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबाला रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरच वडिलांचे अंतिम दर्शन घ्यावे लागले. आजोबांची नातीला पाहण्याची इच्छाही अपूर्ण राहिली.
केवळ पोलिसांच्या आडमुठेपणामुळे महाजन कुटुंबीयावर हि वेळ आली. यासह अनेक नागरिकांच्या देखील तक्रारी आहेत. कोणाची गावाकडे आई आजारी आहे, कोणाचे नातवाईक अडचणीत आहेत. कोणाला औषध पोहोच करायची आहेत. त्यांच्यासाठी तरी पोलीस प्रशासनाने नियम आणि अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.















