- दुकानदारांना दमदाटी करून धान्य उचलतात अनं स्वतःतर्फे मदत केली असे भासवितात
- माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा भाजपवर आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२०) :- देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान गरीब आणि होतकरु कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून मोफत धान्याचं वाटप केले जात आहे. यासाठी राशन दुकानदारही परिश्रम घेत आहे. मात्र, भाजपचे वाचाळवीर धान्य वितरणावरुन राष्ट्रवादीचे गटनेते तथा महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून स्वत:च्या अकलेचे दिवाळे काढत असल्याची टीका माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.
मच्छिंद्र तापकीर म्हणाले, कोरोनाच्या महामारीतही भाजपचे नेते राजकारण करत असून त्याचा तीव्र निषेध आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठीच त्यांचा हा खटाटोप सुरु आहे. पिंपरी – चिंचवड शहरात कित्येक भाजप नेत्यांची राशन दुकाने आहेत. माजी खासदारापासून ते महापौरापर्यंत अनेक नेत्यांचा त्यात समावेश आहे. राज्य सरकार राशन दुकानदारांना मुबलक प्रमाणात धान्य पुरवठा करत असुनही भाजपचे स्थानिक नेते, नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक राशन दुकानदारांना दमदाटी करत आहेत. मोफतचा धान्यसाठा उचलत तो भाजपतर्पे वाटप करत असल्याचे भासविले जात आहे. तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. कोरोनाच्या महामारीतही भाजप नेत्यांना चमकोगिरी सुचत आहे, हे निंदनीय आहे. भाजप नगरसेवकांनी, स्वीकृत नगरसेवकांनी चमकोगिरी बंद करुन स्वत: राहत असलेल्या परिसराची स्वच्छता करावी, घराभोवती साफसफाई करावी, अशी सूचनाही मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.
राज्यात भाजपचे सरकार असताना मागील पाच वर्षात राशन दुकानदारांना विदारक अनुभवाला सामोरे जावे लागले. त्यावेळी भाजपचे आमदार, नगरसेवक मूग गिळुन गप्प होते. आता राज्यात शिवसेना – राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसचे सरकार विराजमान असल्याने भाजप लोकप्रतिनिधींना पोटशूळ उठला आहे. मात्र, कोरोना महामारीच्या काळात निव्वळ राजकारण करणा-या भाजपला पिंपरी – चिंचवडमधील जनता कदापी माफ करणार नाही, असा इशाराही मच्छिंद्र तापकीर यांनी दिला आहे.















