- लोकांना घरातच राहण्याचे केले आगळयावेगळया पद्धतीने आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२०) :- संपूर्ण देशामध्ये सध्या लॉक डाउन सुरू असून, राज्यासह पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आपापल्या घरी राहून कोरोना विषाणूच्या संकटाशी सामना करीत आहेत. या संकटमय काळात शहरातील सर्व रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, पोलीस यंत्रणा, शासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी कोरोना विषाणूला हरविण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत.
त्यांच्या या देशकार्याला सलाम ठोकत चिखली, घरकुल येथील रहिवासी सुजित सुरेश होले या तरुणाने बासरीवर गीत तयार केले आहे. बासरीवर राष्ट्रगीत वाजवून त्याने शहरातील सर्वच ठिकाणी अत्यावश्यक-जीवनावश्यक सेवेत आपले मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सुजितने बासरीवर राष्ट्रगीत वाजवून, पिंपरी चिंचवडसह भारतात लॉकडाऊनमुळे घरातच अडकलेल्या नागरिकांना घरातच राहण्याचे आगळयावेगळया पद्धतीने आवाहन केले आहे. त्याने बासरी वाजवितानाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. त्याच्या या व्हिडीओला फार कमी वेळात अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
त्याच्या या व्हिडीओबद्दल न्यूज पीसीएमसीशी बोलताना सुजित म्हणाला की, ‘मला लहानपणापासून बासरी वाजवण्याची आवड होती. मी वाकड येथील महापालिकेच्या माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. चौथीत असताना आम्हाला श्री. शिरवले सर संगीताचे धडे द्यायचे. तेव्हापासून मी बासरी वादनाचा छंद जोपासत आहे. सध्या पुण्यातील एका खासगी आर्किटेक्चर कंपनीत नोकरीस आहे. लॉकडाऊन असल्यामुळे बराचसा वेळ मी बासरी वादनाला देत आहे. राष्ट्रगीत ही माझी बेस्ट ट्यून आहे. ती वाजविताना खरचं खूपच छान वाटतं. लोकांनी घरातच रहावे, अनं कोरोना युद्धात विजयी व्हावे’, असे आवाहन सुजितने केले आहे.















