- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात करोना विषाणू साथीमुळे सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने लोकांच्या हाताला काम नाही. आर्थिक वर्षाचे कर संकलन मार्च महिन्यात भरले जाते. मात्र, शहरातील करदात्या नागरिकांनी लॉकडाऊन कालावधीत महानगरपालिकेचे सर्व प्रकारचे करसंकलन न भरल्याने महापालिका करदात्या नागरिकांवर आणखी आर्थिक भार वाढविणार आहे. वाढलेल्या आर्थिक भारामुळे व महापालिकेच्या सर्व करामुळे शहरातील करदात्या नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड क्षेत्रातील करदात्या नागरिकांना आर्थिक संकटापासून वाचविण्यासाठी आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीच्या सर्व करसंकलनात २५% (तीन महिन्याच्या करात) सरसकट सूट द्यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शहरात जमावबंदी आणि संचारबंदीला जवळ जवळ एक महिना उलटून गेलेला आहे. आजपर्यंत ८१ करोना बाधित रुग्ण शहरातील विविध परिसरात आढळले आहेत. करोना साथीचा प्रादुर्भाव पाहता, पालिका प्रशासनाने ७ दिवसांसाठी अजून कडक लॉकडाऊन लागू केलेला आहे. एक महिन्यापासून आपल्या महानगरपालिका क्षेत्रातीत सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. लॉकडाऊनमुळे आपल्या महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा व्यापार, उद्योग आणि आर्थिक देवाणघेवाण जवळपास बंद आहे. आपल्या कामगार नगरीत कामगारांच्या हाताला काम नाही. त्यामुळे आपल्या शहर क्षेत्रातीत लोकांचे दरडोई उत्पन्न मागील एक महिन्यात एकदम कमी झाले आहे, असेही वाकडकर यांनी म्हटले आहे.
करोना विषाणूची साथ शहरात दररोज वाढत आहे. यामुळे लॉकडाऊनचा कालावधी अजून वाढण्याची शक्यता आहे. याचा गंभीर परिणाम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अर्थकारणावरती होणार आहे. लॉकडाऊनमुळे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची आर्थिक स्थिती संपूर्णपणे खालावली आहे. आर्थिक वर्षाचे कर संकलन मार्च महिन्यात भरला जातो. मात्र लॉक डाऊन कालावधीत महानगरपालिकेचे सर्व प्रकारचे करसंकलन न भरल्याने नागरिकांवर अजून आर्थिक भार वाढविणार आहे. वाढलेल्या आर्थिक भारामुळे व महापालिकेचे सर्व करामुळे शहरातील नागरिकाचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे, असेही वाकडकर यांनी म्हटले आहे.
त्यामुळे पिंपरी चिंचवड क्षेत्रातील नागरिकांना आर्थिक संकटापासून वाचविण्यासाठी, आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीच्या सर्व करसंकलनात २५% ( तीन महिन्याच्या करात) सरसकट सूट देणे अत्यंत महत्वाचे आहे. सदर सूट महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांवरील आर्थिक भार कमी करून त्यांची आर्थिक क्रयशक्ती वाढविण्यास हातभार लावेल, असे या निवेदनात वाकडकर यांनी म्हटले आहे.















