न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२०) :- कोरोना विषाणूंचा फैलाव झपाट्याने होत आहे. या प्रसाराला रोखण्यासाठी महापालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी जोखीम स्विकारून काम करीत आहेत. त्यांच्या मेहनतीचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे असे प्रतिपादन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी केले.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने युद्धपातळीवर उपाय योजना सुरु आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांना सेवा बजावण्यासाठी घरापासून आपल्या कामकाजाच्या ठिकाणापर्यंत प्रवास करावा लागतो. ज्यांच्याकडे स्वत:चे वाहन नाही अथवा जे कर्मचारी बसने प्रवास करु इच्छितात त्यांना प्रवास करण्यासाठी आज पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे बस प्रवासासाठीचा मोफत पास देण्यात आला. या पासचे औपचारिक हस्तांतरण आज प्रशासनाकडे महापौर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी पीएमपीएमलचे समन्वयक अधिकारी संतोष माने, महापालिका कर्मचारी आबा गोरे, महादेव बोत्रे, वैभव देवकर, सुरेश खत्री, विजय मुंडे, गणेश कौठेकर, पांडुरंग मस्के, सामाजिक कार्यकर्ते संजय कुटे आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आणि भोसरी येथील रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याठिकाणी डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आया, वॉर्डबॉय आदी कर्मचारी काम करतात. यातील जवळपास १९३ अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना बसने प्रवास करावा लागतो. या कर्मचा-यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने दोन महिने कालावधीकरीता मोफत बस पास उपलब्ध करुन दिला आहे. दि. २३ जून पर्यंत या कर्मचा-यांना पीएमपीएमल बस मधून विनामुल्य प्रवास करता येईल. याकामी महापौर ढोरे आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या पुढाकारामुळे कर्मचा-यांना अशी सुविधा उपलब्ध झाली असून एक प्रकारे कर्मचा-यांना पाठबळ देणारी ही बाब असल्याची भावना कर्मचा-यांनी व्यक्त केली.
महापालिकेचे अधिकारी कर्मचारी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये अतिशय चांगले काम करीत आहेत. विशेषत: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरी रुग्णालयाचा संपुर्ण स्टाफ खुप कष्ट घेत आहे. या सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी सुचना महापौर ढोरे यांनी केली. नागरिकांनी देखील सहकार्य करुन महापालिकेने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन केले.















