न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२०) :- देशभरात दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेतला होता. त्यावर शनिवारी सकाळी केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं.
गाव पातळीवर मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. परंतु कॅन्टोनमेंट झोन किंवा करोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी नसेल.
तसंच शहरांमध्येही महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील सर्व स्टँडअलोन शॉप्स, रहिवासी परिसरातील दुकानं आणि रेसिंडेन्सिअल कॉप्लेक्समधील दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली असल्याचं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर बाजारपेठांमधील दुकानं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. तसंच शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्पलेक्स आणि शॉपिंग मॉल्स सुरू ठेवण्यासाठी मनाई असेल. गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शॉप्स अँड एस्टॅबलिशमेंट कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकांनांनाच सूट देण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त मद्य विक्री करणाऱ्या दुकांनाना सुरू करण्याची परवानगी दिली नसल्याचंही स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे.
दरम्यान ३ मेपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही दुकानं सुरु होणार नाहीत असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने काल रात्री उशिरा काही निर्देश दिले आहेत. ज्यानुसार काही दुकानांना, व्यवहारांना केंद्र सरकारने संमती दिली आहे. मात्र जोपर्यंत राज्य शासन यामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात असलेली दुकानं सुरु करण्याचा काही प्रश्नच येत नाही. काल रात्री केंद्राने काही निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.


















