न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२०) :- सकस आहार, घरातल्या घरात विहार आणि शांत विचार ठेवले व दूर चित्रवाणीवरील कोरोना विषयक माहितीची भिती न बाळगलेस आपण आपले आरोग्य सदृढ करू शकतो आणि आपण कोरोनाला हरवू शकतो असे मत प्रसिध्द फिजीशियन व निरामय हॉस्पीटलचे संचालक डॉ. श्रीरंग गोखले यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना सोबत जगतांना याविषयावर फेसबुक लाईव्हसिरीज मध्ये जेष्ठ नागरीक, गरोदर महिला, व दूर्धर आजार असलेल्या नागरीकांनी घ्यावयाची काळजी या विषयावर संवाद साधतांना ते बोलत होते. या वेळी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर हे उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरीकांसाठी व सर्व शहरवासीयांसाठी ताप असणारा कोरोना निश्चितच जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित रहा घरातच रहा, असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सारथी ऍप विकसीत केला असून त्याद्वारे आरोग्याची माहिती महानगरपालिका जाणून घेत आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरीकांनी आपली माहिती भरावी म्हणजे आपल्याला माहिती देता येईल. कोरोना सोबत जगतांना ज्येष्ठ नागरीकांसह सर्वांनी काळजी घ्यावी. वैद्यकीय कारणास्तव व अत्यावश्यक व्यवसायासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरांतर्गत पास देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. कोरोना संसर्गाचे नागरीकांचे नमुने घेण्याचे संख्येत वाढ केली असून आता पर्यत सुमारे २५०० नागरीकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्ग होण्याचा धोका हा ज्येष्ठ नागरीक व दूर्धर आजाराने बाधीत नागरीक व गरोदर महिला यांना अधिक असलेने या कोरोना पासून वाचण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी व त्याचे बरोबर जगण्यासाठी स्वत:लासज्ज ठेवावे असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.
यावेळी डॉ.गोखले म्हणाले की, ज्येष्ठ नागरीक म्हणजे वयाने जास्त व कर्तूत्वाने श्रेष्ठ असतात. स्वत:ची काळजी घ्या, क जिवनसत्वाचा आपल्या आहारात अंतर्भाव करावा, सकस आहारा मार्फत प्रतिकार शक्ती वाढवणे, वेळेत व प्रमाणात आहार घेतले तर शरीरास उर्जा मिळते. नियमीत व्यायाम करा, मात्र ते घरीच करा, सध्याचे काळात व्ययामासाठी बाहेर गेले तर कोरोना तुमची वाट बघतोय असेही डॉ.गोखले म्हणाले.
विचारात स्थिरता आणणे, रामायण महाभारत मालिका पाहणे, घरातील आपली पुस्तके व मोबाईल वर उपलब्ध पुस्तके वाचण्यात ज्येष्ठानी वेळ घालवावा. नातवंडांना बाहेर घेवून जाऊ नका, देव पुजेसाठी आवश्यक फुले वेचण्यासाठी सध्या बाहेर पडू नका. विचार शांत ठेवले तर रक्तदाब वाढत नाही. औषधापचार वेळेत घ्या व वैद्यांचा सल्ला घ्या. दूर्धर आजार रोखण्यासाठी प्रतीकारशक्ती वाढवणे, संयम व शांतता राखणे ह्या गोष्टी केल्या तर जेष्ठ नागरीक निश्चितच कोरोनाला हरवू शकतील असेही डॉ. गोखले यांनी सांगीतले. नागरीकांच्या भल्यासाठी, कोरोना पासून बचावासाठी प्रशासन एक दिशेने काळजी घेत आहे. तेवढे सहकार्य आपण सर्वांनी करावे असेही ते म्हणाले.
शासन कोरोनाला दूर ठेवण्यासाठी एक दिशेने काम करीत आहे. आपणही त्यासाठी सहकार्य केल्यास सर्वांना “जिवेत् शरद शतम्” होता येईल. गर्भवती महिलांनी या कोरोना काळात आपली काळजी घ्यावी. ताप, खोकला, धाप लागणे असे काही लक्षणे दिसून आल्यास रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी. आपण सर्वांनी या कोरोनाला न घाबरता घरातच राहून साथ दिली तर निश्चितच कोरोनावर मात करू शकू असा विश्वास असल्याचे डॉ.गोखले या वेळी म्हणाले.


















