न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे. २०२०) :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना लॉकडाउनमधून मुंबई, ठाणे, पुणेकरांना दिलासा दिला जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद येथे आकडे वाढत असून तिथे काही करणं आपल्या हिताचं नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दल बोलताना सांगितलं आहे की, “३ मे नंतर काय करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्थचक्र रुतलं आहे. बेरोजगारी वाढणार असं सांगितलं जात आहे. हे खऱं आहे, नाही असं म्हणणं योग्य नाही. पण अर्थासोबत संपत्ती जर म्हणाल तर प्रत्येक राष्ट्राची आणि राज्याची महत्त्वाची आणि खऱी संपत्ती त्यांची जनता असते. त्यांना प्राथमिकता दिली पाहिजे. “रेड झोन म्हणजे जागृत ज्वालामुखी, ऑरेंज झोन म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी आणि ग्रीन झोन म्हणजे तो ज्वालामुखी पुन्हा पेटेल असं वाटत नाही. पण ग्रीन झोनमध्ये जर कोणी करोना रुग्ण आला तर पुन्हा हाहाकार माजू शकतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
सध्यातरी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या ठिकाणी लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे. विशिष्ट भागातील परिस्थिती पाहून तीन मे नंतर आम्ही निश्चित निर्बंध शिथील करु, पण जनतेला त्यांनी सावध राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले.


















