न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे. २०२०) :- चिंचवडमधील संभाजीनगर येथील रहिवाश्यांनी कोरोना दाम्पत्याचे फुले उधळून, ढोल-ताशाच्या गजरात व औक्षण करून स्वागत केले. मात्र, प्रसंगी परिसरात मोठी गर्दी उसळली. नागरिक रस्त्यावर उतरले होते.
त्यामुळे शासनाने दिलेल्या संचारबंदी, जमावबंदीच्या आदेशाचेही उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका मंगला कदम आणि परिसरातील अमेय सुधीर नेरुरकर, कल्पेश गजानन हाने, संतोष शिवाजी वराडी (सर्व रा. संभाजीनगर, चिंचवड) यांना जबाबदार धरून गुन्हा दाखल केला आहे.
थोडक्यात माहिती अशी की, पुण्यातील नामवंत रुग्णालयात नोकरी करत असणाऱ्या एका नर्सला व तिच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. हे दोघेही पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत होते. दरम्यान या दोघांचा १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतरच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना डीश्चार्ज मिळाला होता. त्यामुळे हे दांपत्य आपल्या संभाजीनगरमधील घरी आले. रहिवाश्यांनी कोरोना दाम्पत्याचे फुले उधळून, ढोल-ताशाच्या गजरात व औक्षण करून स्वागत केले. यावेळी परिसरात गर्दी जमल्यामुळे संचारबंदी आणि जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे.


















