- काळेवाडी शिवसेना विभागप्रमुख मारुती दाखले यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २. मे. २०२०) :- कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातले असताना सरकारने त्याचा होणारा फैलाव रोखण्यासाठी संपुर्णपणे लॉकडाऊन जाहिर केला आहे. असे असताना लॉकडाऊनचा फायदा घेऊन सर्वत्र दारु विक्री बंद असूनसुध्दा छुप्या पध्दतीने उत्पादन शुल्क विभागाच्या निरक्षकांना, काही पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन देशी विदेशी दारुची चढ्या भावाने मोठ्या प्रमाणात विक्री झालेली आहे व होत आहे.
सर्वच दारु विक्री दुकानाचे परमिट रुम बिअरबारचे स्टॉक रजिस्टर तपासून दोषी लायसन्स चालकांवर गुन्हे दाखल व्हावेत. शासनाचे सर्व नियम या लॉबीने पायदळी तुडविले असून, मोठा नफा त्यांनी गैरमार्गाने कमवला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांची दुकाने सील करण्याच्या अधीच ही विक्री मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने परमिटरुम व वाईनशॉप विक्रेत्यांना काही नियम व अटी ठरवून दिलेले आहेत. त्यानुसार रोजच्या मालाच्या विक्रीचा तपशील रोजच्या रोज कळवावा लागतो. लॉकडाऊन जाहिर होण्याच्या दोन दिवस अगोदरचा तपशील उत्पादन शुल्क विभागाकडे आला असेलच, त्यामुळे बेकायदेशीर दारु विक्री केलेल्या मालाविषयी स्टॉक रजिस्टर चेक करुन दोषीवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी काळेवाडी शिवसेना विभागप्रमुख मारुती दाखले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


















