न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे. २०२०) :- परराज्यातील, महाराष्ट्रातील नागरिक ठिकठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना आता आपल्या घरी जाण्याची ओढ आणखी तीव्र झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात अडकलेल्या परप्रांतीय आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी शासनाने काही नियम घालून दिले आहेत. त्या नियमांचे पालन करूनच नागरिकांना त्यांच्या गावी जाता येणार आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कंटेन्मेंट झोनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना स्थलांतराची परवानगी मिळणार नाही, असे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) सुधीर हिरेमठ यांनी दिले आहेत.
यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून परराज्यात जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित मजूर, भाविक, पर्यटक, विद्यार्थ्यांना ते राहत असलेल्या परिसरातील संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागेल. प्रत्येक व्यक्तीची डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून त्यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे लागणार. पोलीस ठाण्यातून ती माहिती तहसीलदारामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयातून संबंधित नागरिकांचे अर्ज त्यांच्या मूळ गावातील संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविले जातील. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील संबंधित परिमंडळाचे पोलीस उपायुक्त नागरिकांना, नागरिकांच्या गटाला पास देतील.
पाच पेक्षा कमी व्यक्तींना परराज्यात अथवा महाराष्ट्र राज्यात जिल्हाअंतर्गत तातडीच्या कारणास्तव प्रवास करायचा असेल तर त्यांनी covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर विनंती अर्ज करावेत. सोबत वैद्यकीय ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.कंटेन्मेंट झोनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना परवानगी मिळणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.


















