न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे. २०२०) :- पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळून जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, औद्योगिक आस्थापना तात्काळ सुरु करता येतील, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
यामुळे गेल्या सव्वा महिन्यांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्रातील व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व उद्योग धंदे व कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही औपचारिक परवानगीची, पासेसची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील कोणत्याही कामगार किंवा कर्मचारी याला कामावर जाण्याची किंवा प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. उर्वरित क्षेत्रातील कामगारांनी सोबत आपले ओळखपत्र बाळगावे. पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कामगार किवा कर्मचारी यांची वाहतूक करण्यासाठी औद्योगिक आस्थापना उद्योग कारखान्यांनी खास वाहतूक व्यवस्था ( डेडीकेटेड ट्रान्सपोर्ट रेंजमेंट ) करायला हवी, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.


















