न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२०) :- राज्यात सध्या लॉकडाउन सुरु असल्यानं काही शैक्षणिक संस्था पालकांना विद्यार्थ्यांची फी भरण्याची सक्ती करीत आहेत. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारांची दखल घेत शासनाने सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करुन नये, असे निर्देश दिले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१साठी कोणतीही फी वाढ करु नये. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी जर काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही तसेच त्या साठीचा खर्च कमी होणार असेल तर पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये (ईपीटीए) ठराव करुन त्याप्रमाणे योग्य प्रमाणात फी कमी करावी. लॉकडाउनच्या काळात गैरसोय टाळण्यासाठी पालकांना ऑनलाइन फी भरण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा.
वरील आदेश सर्व बोर्डाच्या, सर्व माध्यमांच्या व पूर्व प्राथमिक ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लागू असतील, असं राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागानं काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
–















