- आयुक्तांनी प्रभागनिहाय काही मोजक्या सलूनच्या दुकानांना परवानगी द्यावी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२०) :- करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन आहे. या लॉकडाउनमुळे पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे तीन हजार सलूनची दुकाने बंद आहेत. तर त्यामध्ये काम करणार्या सुमारे २० हजारांहून अधिक जणांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासोबतच सलूनमध्ये जाऊन आपल्याला हवी तशी दाढीची स्टाईल व केसांची रचना करून घेणार्या नागरिकांवरही दाढी व केस वाढविण्याची वेळ आली आहे. दाढी घरीही करता येते, मात्र केस कटिंगचे कसे करायचे? तसेच दाढीमुळे मास्क नीट न बसल्यास कोरोना या संसर्गजन्य आजाराचा धोकाही संभवू शकतो. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी शहरात प्रभागनिहाय काही मोजके सलूनची दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी द्यावी.
आयुक्तांनी सरसकट दुकानांना परवानगी न देता, प्रभागनिहाय थोडक्या दुकानांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची व सलून दुकानदारांची आरोग्य तपासणीची अट घालूनच ही परवानगी मिळावी. दुकानासमोर कोणतीही वर्दळ न करता, बँकेत ज्या प्रमाणे ग्राहकांसाठी टोकन पद्धत अवलंबविली जाते, त्या प्रमाणे सलून दुकानातही टोकन पद्धतीच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा दिली जावी. त्यामुळे दुकानाच्या आवारात दिवसभरात ग्राहकांची संख्याही मर्यादित राहू शकेल.
सव्वा महिन्यांपेक्षा अधिक काळ दुकाने बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. सलून बंद असल्यामुळे कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या महापालिकेने शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाशिवाय इतर दुकानदारांना त्यांची दुकाने सुरु ठेवण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरात सलूनची दुकानेही उघडी ठेवण्यास आयुक्तांनी परवानगी द्यावी, अशी मागणी शहरातील जाणकार नागरिक करीत आहेत.


















