न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२०) :- सध्याच्या बिकट परिस्थितीत सरकारला महसूल मिळावा, यासाठी शहरातील विक्रेते आणि व्यावसायिकांना परवानगी देण्यासाठी अर्ज भरुन घेतले जात आहेत. गेल्या ४५ दिवसांपासून व्यवसाय पूर्णपणे ठप्प असल्याने व्यापारी आणि व्यावसायिक वर्ग आर्थिक दृष्ट्या त्रस्त झालेला आहे. पालिका काही ठराविक दुकाने उघडण्यास परवानगी देणार हे कळाल्यावर अनेक व्यावसायिकांनी समाधान व्यक्त् केले. परंतु दुकान उघडण्यासाठी परवानगी देणाऱ्या अर्जासोबत जोडावयची कागदपत्रे पाहताच व्यवसायिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नियमावलीप्रमाणे पालिकेने आपल्या संकेतस्थळावर परवानगीसाठीचा अर्ज अपलोड केला आहे. हा अर्ज संबंधित क्षेत्रीय कार्यालयात जमा करायचा आहे. या अर्जासोबत तीन कागदपत्रे जोडण्यास सांगण्यात आली आहेत. त्यात शॉप ऍक्ट, उद्योग आधाराची झेरॉक्स आणि दुकानाचा मार्च-२०२० अखेरपर्यंतचा कर भरला असल्याच्या पावतीची झेरॉक्स जोडण्यास सांगितले आहे.
पुणे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या पत्रकानुसार संदर्भ जावक नं . मआ/साप्रवि/६२० प्रमाणे पुणे महानगर पालिका क्षेत्रात विना अटी तेथील व्यापाऱ्यांना नियमावली नुसार दुकाने व उद्योग चालू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचधर्तीवर पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक क्षेत्रातदेखील औद्योगिक कंपन्या, उद्योगधंदे व दुकाने चालू करण्यास महापालिकेने विनाअट परवानगी द्यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा उद्योजक प्रदीप गायकवाड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


















