- सुखद घटना… आज रुपीनगर व मोशीतील पंधराजण कोरोनामुक्त…
- तर, ताम्हाणे वस्ती, त्रिवेणीनगरमधील परिसर मध्यरात्रीपासून सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शुक्रवारी रुग्ण संख्या आटोक्यात आल्याची स्थिती निर्माण झाली. सायं. ६.३० वाजेपर्यंत आलेल्या अहवालात जुनी सांगवीतील १६ वर्षीय युवतीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पुण्यातील ताडीवाला रोड येथील एका सहा वर्षांच्या बालकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरातील सकारात्मक रुग्ण संख्या १५५ वर पोहोचली असून, महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या ६८ वर पोहोचली आहे.
दरम्यान रुपीनगर व मोशीतील पंधरा कोविड-१९ बाधित रुग्ण वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. त्यांची दोन्ही वेळची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७६ वर पोहोचली आहे.
तसेच ताम्हाणे वस्ती, त्रिवेणीनगर येथील ( मोरया (विनायक) मेडिकल – श्री महालक्ष्मी ट्रेडर्स – श्री स्वामी समर्थ स्नॅक समोर – त्रिवेणीनगर रोड – श्रीराम फॅब्रिकेशन वर्कस् – हनुमान मेडिकल – म्हेत्रेवाडी उद्यान – जलशुध्दीकरण केंद्र – मोरया (विनायक) मेडिकल परिसर आज मध्यरात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.


















