- वाचा… डिजिटल पास मिळविण्याची सोपी पद्धत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मे २०२०) :- कोरोना विषाणूचा संक्रमणापासून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यान सर्व प्रकारची शासकीय, खासगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रवासावर बंधने आलेली आहेत. तथापि अत्यावश्यक कारणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून नागरिकांना प्रवासासाठी डिजिटल पास उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
डिजिटल पास प्राप्त करण्यासाठी महानगरपालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी या मोबाईल अॅप्लिकेशनवर ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. डिजिटल पास संबंधीत क्यूआर कोड एसएमएसवर पाठविला जाईल. हे डिजिटल पास फक्त पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये प्रवास करण्यासाठी आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लॉक डाऊनच्या नियमांच्या अधीन राहून हे पास देण्यात येतील. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी, राज्य किंवा केंद्र शासनातील शासकीय कर्मचारी, बँक आणि एटीएम, गॅस, एलपीजी, पेट्रोल पंप, वैद्यकीय उपकरणांचे उत्पादक आणि पुरवठादार, टेलिकॉम इंटरनेट केबल, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक, सुरक्षा सेवा, इतर अत्यावश्यक सेवा, इतर सुट दिलेली श्रेणी, नागरिकांना मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, अन्न वितरण वाहन इत्यादी श्रेणीमाठी ‘ डिजिटल पास ‘ उपलब्ध आहेत.
प्रवासादरम्यान नागरिकांनी शासकीय मान्यताप्राप्त ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. पोलिसांनी थांबविल्यास संबंधित व्यक्तीने सदर ओळखपत्र व ‘ डिजिटल पास ‘ क्यूआर कोड दाखविणे अनिवार्य आहे. प्रवास करताना मार्गदर्शक तत्त्वे आणि आदेशांचे पालन करणे नागरिकांसाठी बंधनकारक राहील. होम कारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांनी डिजिटल पाससाठी अर्ज करू नयेत. आपल्या अर्जावरती स्वीकृती किंवा नकार देण्याचे अधिकार महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर २४ तासांच्या आत नागरिकांना पासबाबत स्वीकृती अथवा नकार कळविण्यात येईल. ही सुविधा महानगरपालिकेच्या पीमीएममी स्मार्ट सारथी अॅपवर ” सोमवार दि. ११ मे २०२० पासून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पुढील लिंकवर क्लिक करा आणि अॅप डाउनलोड करा :-
Google Play store – https://bit.ly/PCMCSmartSarathiApp
App Store Link – https://bit.ly/IPCMCSmartSarathiIOS

















