न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे. २०२०) :- दारूच्या नशेत असणाऱ्या आपल्या पोटच्या मुलाला घरातील व्यक्तींनी ठार मारल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. याप्रकरणी आई, वडील आणि भाऊ यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, विजय रामदास वखरे (वय २८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर गणेश रामदास वखरे (वय ३०), रामदास श्रीधर वखरे (वय ५०), चंचल रामदास वखरे (वय ४६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सुखदेव मुदळ यांनी फिर्याद दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलीस ठाण्याच्या परिसरात घरगुती वादातून पोटच्या मुलाचे हात-पाय बांधत दोरीने गळा आवळून खून केल्याचं समोर आलं आहे. अगोदर ही आत्महत्या असल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर पोलीस चौकशीत तो खून असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असल्याचे वाकड पोलिसांनी सांगितले. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे.















