न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून ३६ खासगी बसने आठशेवर परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले आहे. लॉकडाऊन असल्याने परप्रांतीय मजूर, भाविक, पर्यटक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने शहरात अडकले होते. तसेच हजारो स्थलांतरित नागरिक निवारा केंद्रात दाखल झाले होते. आम्हाला आमच्या मूळगावी जाऊ द्या. असा तगादा त्यांनी लावला होता.
पोलिसांनी मजुरांची माहिती संकलित केली. तसेच काही सामाजिक कार्यकर्ते व संघटना यांच्या माध्यमातून खासगी बसचे नियोजन केले. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ओडिसा ६, उत्तर प्रदेश २, मध्यप्रदेश २, जम्मू काश्मीर १ अशा ११ बस रवाना करण्यात आल्या आहेत. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उत्तर प्रदेश २, जम्मू काश्मीर १ व बिहार २ अशा पाच बस रवाना करण्यात आल्या आहेत. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून राजस्थान ३ व तेलंगणा २ अशा पाच बस रवाना करण्यात आल्या आहेत. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कर्नाटकात गुलबर्गा येथे ३ बस रवाना करण्यात आल्या आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मध्यप्रदेश येथे दोन बस रवाना करण्यात आल्या आहेत. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उत्तर प्रदेश येथे दोन तर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून राजस्थानात तीन बस रवाना करण्यात आल्या आहेत.
बसच्या क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात येत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे. तसेच सनिटायझरसह सुरक्षा साधनांचा वापर करून खबरदारीचे आवाहन पोलिसांनी केले आहे.













