- उद्योगांना चालना देण्यासाठी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा..
- १८ मे नंतरही लॉकडाउन वाढवणार मात्र, स्वरुप वेगळे असेल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे. २०२०) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताना हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याची माहिती दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज लॉकडाउन ४ ची घोषणा करण्यात आली. मात्र त्यांनी याचे नियम हे पूर्णपणे वेगळे असतील जे तुम्हाला १८ मे पूर्वी कळवण्यात येतील असं पंतप्रधानांनी सांगितलं. राज्यांनी लॉकडाउन संदर्भात काही सूचना केल्या आहेत. काही मतं मांडली आहेत. त्यानुसार लॉकडाउनचं स्वरुप असेल. ते नेमकं काय आणि कसं असेल ते १८ मेपूर्वी स्पष्ट करण्यात येईल असंही मोदींनी म्हटलं आहे. त्यामुळे लॉकडाउन ४ होणार हे नक्की मात्र तो किती कालावधी असेल नवे नियम काय असतील ते समजण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी करोनाशी लढण्यासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजुरांसाठी तसेच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी पॅकेज आहे असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. “पॅकेजद्वारे आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यात येईल. शेतकऱ्यांना थेट पैसे मिळतील, हेदेखील त्यावेळेस झालं आहे ज्यावेळेस सगळं बंद होतं. सुधारणा आता आणखी वाढवाव्या लागतील,” असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं.
जगात ४२ लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले असून पावणे तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका व्हायरसने संपूर्ण जगाचं नुकसान केलं आहे. असं संकट ना कधी पाहिलं ना ऐकलं आहे. हे संकट खूप मोठं आहे. पण थकणं, पराभूत होणं माणसाला मंजूर नाही. सतर्क राहूनही सर्व नियमांचं पालन करायचं आहे. जीव वाचवायचा आहे आणि पुढे वाटचालही करायची आहे. जग संकटात असताना आपल्याला कठोर संकल्प करण्याची गरज आहे. आपला संकल्प या संकटापेक्षाही विराट असणार आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
“एक राष्ट्र म्हणून आज आपण महत्त्वाच्या वळणावर आहोत. करोना संकट भारतासाठी एक संकेत, संदेश, संधी घेऊन आली आहे. जेव्हा करोना संकट सुरु झालं तेव्हा भारतात एकही पीपीई किट तयार नव्हतं. एन-९५ मास्कचं नावापुरतं उत्पादन होत होतं. पण आता भारतात रोज दोन लाख पीपीई किट्स आणि दोन लाख मास्क तयार केले जात आहेत. हे करु शकलो कारण आपण संकटाला संधीत रुपांतरित केलं. आज जगभरात आत्मनिर्भर शब्दाचा अर्थ आपण पूर्णपणे बदलला आहे,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.













