- सामाजिक कार्यकर्ते प्रदिप तापकीर व त्यांच्या सहकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मे. २०२०) :- कोरोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न होताना दिसून येत आहे. मात्र, कोरोनाचा सर्वाधिक धोका चोवीस तास शहराच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून, कोरोनाशी लढा देत शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या पिंपरी चिंचवड शहर पोलीसांना अधिक आहे. त्यांनाही सुरक्षा साधनांची गरज भासत आहे. त्यासाठी भाजपा आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी व सामाजिक कार्यकर्ते प्रदिप (आबा) तापकीर पुढे सरसावले आहेत.
तापकीर यांनी हरिभाऊ तापकीर व संजय पठारे यांच्या मदतीने सामजिक बांधिलकीच्या नात्याने, स्वतः पुढाकार घेऊन स्व-खर्चाने दिघी / चऱ्होली पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर-टनेलची उभारणी केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदिप (आबा) तापकीर, हरिभाऊ तापकीर व संजय पठारे तसेच दिघी/चऱ्होली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सॅनिटायझर-टनेलच्या उभारणीमुळे पोलिसांनी तापकीर यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
प्रदीप तापकीर म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग कधीही होऊ शकतो, ही भीती पोलिसांच्या मनात सतत असली तरी, कर्तव्यदक्ष पोलिस जीवाची बाजी लावून, जनतेसाठी खंबीरपणे उभे आहेत. चऱ्होली परिसरातील काही पोलीस बांधवाना कोरोनाची लागण देखील झालेली आहे. त्यामुळे पोलिसांची स्वच्छता व सुरक्षेची काळजी घेत, निर्जंतुकीकरणासाठी दिघी/चऱ्होली पोलिस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर-टनेलची उभारणी केली आहे. त्यामुळे पोलिसांचे निर्जंतुकीकरण होईल व काही प्रमाणात कोरोनाचा धोका टळेल.













