- कंपन्या सुरु करण्यास परवानग्या द्या – संदीप बेलसरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहर रेडझोनमध्ये येत असल्याने सरकारने लघुउद्योग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यास सांगितले आहे. ग्रामीण भागातील चाकण, तळेगाव, रांजणगाव, शिक्रापुर भागातील लघुउद्योगांना परवानगी दिली आहे. दीड महिने आम्ही सरकारच्या सुचनेनुसार उद्योग बंद ठेवले. आता सरकारने आम्हाला मदत करण्याची आवश्यकता आहे. कामगारांचे पगार करायला पैसे नाहीत. २२ मार्चपासून सर्व व्यवहार बंद झाले आहेत. एक रुपयाचेही पेमेंट आले नाही. सरकार केवळ कामगारांना पगार देण्याचे सांगत आहे. पण, आम्ही पगार कसा द्यायचा.
एमआयडीसीतील कोणताही भाग कंटेनमेंट झोनमध्ये नाही. मग, कंपन्या चालू करण्यास काही अडचण आहे. कोणत्या कारणामुळे बंद ठेवल्या आहेत. तळवडे, कुदळवाडीतीलही काहीच भाग कंटेनमेंट झोन आहे. उर्वरित भागात कंपन्या चालू करण्यास परवानगी द्यावी. महापालिका आयुक्तांना वारंवार विनंती करूनही ते या प्रकरणी दुर्लक्ष करत असून ठोस निर्णय घेत नाहीत.
पिंपरी चिंचवड शहरातील कंटेनमेंट झोन वगळता इतर उद्योग त्वरित सुरू करा. कामगारांचे मागील दोन महिन्यांचे वेतन सरकारने द्यावे. महावितरण कडून आलेलं सरासरी वीजबिल माफ करावे. थकित कर्जाचे हाप्ते व व्याज माफ करावे. सरकारकडून जीएसटी भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. कंपन्या पुन्हा सुरू करण्याची परवानगी प्रक्रिया सरळ आणि सोपी असावी. पंतप्रधानांनी घोषित केलेल्या आर्थिक पॅकेज हे टर्नओव्हर नुसार दिले जावे. मोठ्या उद्योगांना २ टक्के तर लघु व सूक्ष्म उद्योगांना ५ टक्के मदत जाहीर करावी, अशा मागण्या पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत.


















