न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२०) :- कोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे सांगितले.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून व विश्वासात घेवूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल. सोलापूर, सातारा व पंढरपूर येथील मान्यवरांची आषाढी वारी पालखी सोहळयाबाबतची मते विचारात घेतली जाणार आहेत. राज्य मंत्रीमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा केली जाणार असून त्यांनतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
या बैठकीमध्ये पालखी सोहळयाचे स्वरूप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग,प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळयाच्या आयोजनाबाबतचे पर्याय, पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.


















