न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२०) :- पुणे शहर आणि हवेली तालुका वगळता जिल्ह्य़ाच्या इतर भागातील २१ दस्त नोंदणीची कार्यालये सोमवारपासून (१८ मे) सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शुक्रवारी दिले. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार सुरू होणार आहेत. याबाबत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांनी जिल्हाधिकारी राम यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्यानुसार हे आदेश प्रसृत करण्यात आले.
पुणे शहर आणि हवेली तालुका प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याने या परिसरातील दस्त नोंदणीची कार्यालये बंदच राहणार आहेत. अन्य बारा तालुक्यांमधील दस्त नोंदणी आणि विशेष विवाह नोंदणी कार्यालये सुरू केली जाणार आहेत. या कार्यालयांमध्ये कामकाज करताना करोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, याबाबतची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या आहेत.
सोमवारपासून सुरू करण्यात येणाऱ्या कार्यालयांमध्ये बारामती तालुक्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग दोन कार्यालय, बारामती क्र. एक, सह दुय्यम निबंधक निबंधक वर्ग-दोन कार्यालय, बारामती क्र. दोन ही कार्यालये आहेत. शिरूर तालुक्यातील शिरूरमधील दुय्यम निबंधक कार्यालय व तळेगाव ढमढेरे येथील कार्यालये सुरू होतील. दौंड तालुक्यातील दौंडमधील दुय्यम निबंधक कार्यालय व केडगाव येथील कार्यालयांचा समावेश आहे. भोर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय, वेल्हा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय आणि इंदापूर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होणार आहे. जुन्नर तालुक्यातील जुन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालय व नारायणगाव येथील कार्यालये सुरू होतील. आंबेगाव तालुक्यात आंबेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय, पुरंदर तालुक्यातील पुरंदरमधील दुय्यम निबंधक कार्यालय, मुळशी तालुक्यातील पौड येथील दुय्यम निबंधक कार्यालय व हिंजवडी येथील कार्यालये सुरू केली जाणार आहेत. मावळ तालुक्यातील वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे आणि लोणावळा येथील दुय्यम निबंधक कार्यालये सुरू होतील. खेड तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय खेड एक (खेड), खेड दोन (चाकण), खेड तीन (खेड) ही कार्यालये सुरू होतील, असे जिल्हाधिकारी राम यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.