न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२०) :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या लॉकडाऊन सुरु असला तरी महावितरण आणि पिंपरी विभागातील तब्बल 180 हाऊसिंग सोसायट्यांच्या फेडरेशनचे 56 प्रतिनिधी यांच्यातील थेट संवादाचा ऑनलाईन ‘वेबिनार’ कार्यक्रम गुरुवारी (दि. 15) रात्री 7 ते 8.30 वाजेदरम्यान उत्साहात झाला. महावितरण व वीजग्राहक यांच्यातील अशा संवादाचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.
महावितरणच्या पिंपरी विभाग अंतर्गत वाकड, हिंजवडी, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, रावेत, पुनावळे आदी परिसरातील सुमारे 18 हजार वीजग्राहकांच्या 180 हाऊसिंग सोसायट्यांची शिखर संस्था म्हणून पिंपरी चिंचवड को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन कार्यरत आहे. या सर्व परिसरातील वीजप्रश्न, महावितरणची विकासात्मक कामे, ग्राहकसेवा आदींबाबत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ऑनलाईन ‘वेबिनार’चे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. चर्चात्मक ‘सेमिनार’सारखाच मात्र वेबद्वारे ऑनलाईन होणाऱ्या कार्यक्रमास ‘वेबिनार’ म्हटले जाते.
सुमारे दीड तासांच्या या ‘वेबिनार’मध्ये या 180 सोसायट्यांच्या परिसरात होणारी वीजयंत्रणेतील नवीन कामे, मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच प्रामुख्याने ऑनलाईन वीजबिल भरणा, विविध ग्राहकसेवा, सोसायट्यांसाठी नव्यानेच सुरु करण्यात आलेली ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी’ची सुविधा आदींची माहिती देण्यात आली. वीजग्राहकांनी मोबाईल अॅपच्या किंवा वेबसाईटच्या माध्यमातून मीटर रिडींग पाठविण्याचे तसेच ऑनलाईनद्वारे वीजबिल भरणा करण्याची विनंती महावितरणकडून यावेळी करण्यात आली. वीजविषयक स्थानिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अनेक शंका किंवा प्रश्नांना महावितरणकडून माहितीसह उत्तरे देण्यात आली. तसेच लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठ्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. महावितरणचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनीही ‘वेबिनार’ उपक्रमाचे स्वागत करून आयोजकांना धन्यवाद दिले.
या ‘वेबिनार’मध्ये मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, गणेशखिंड मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. पंकज तगलपल्लेवार, पिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. शिवाजी वायफळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्तात्रेय बालगुडे, उपकार्यकारी अभियंता संतोष पटनी, अमोल बनसोडे, स्मीता अंबाडकर, व्यवस्थापक (लेखा व वित्त) गणेश दांगट, सहाय्यक अभियंता सनी टोपे तसेच पिंपरी चिंचवड को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनकडून माजी अध्यक्ष व ‘वेबिनार’चे मुख्य संयोजक श्री. सुदेश राजे, चिटणीस श्री. के. सी. गर्ग, सचिन लोंढे, अरुण देशमुख, सुधीर देशमुख, दत्तात्रेय देशमुख, हेमचंद्र कुरील, विजय गानू आदींसह विविध सोसायट्यांच्या 56 पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या ‘वेबिनार’साठी जयवंत घोडके यांनी तांत्रिक सहाय्य केले तर डॉ. वैशाली घोडके यांनी आभार मानले.