न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२०) :- पिंपरी-चिंचवड ही कामगार कष्टकऱ्यांची नगरी आहे. कोरोनामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे तळ हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कष्टकरी जनतेचे हाल होत आहेत. गोरगरीब कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये यासाठी सर्व कष्टकरी कामगारांना जेवण मिळावे यासाठी कष्टकरी कामगार पंचायतीच्या सुरू केलेले अन्नछत्रास पूर्ण मदत सहकार्य करण्यात येईल, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.
रिक्षाचालक, टपरी, पथारी, हातगाडीधारक, धुणीभांडी, स्वयंपाक, साफसफाई काम करणाऱ्या महिला, कागद-काच-पत्रा वेचक महिलांसाठी कष्टकरी कामगार पंचायत वतीने अन्नछत्र (किचन) सुरू करण्यात आले आहे. यास आमदार महेश लांडगे यांनी भेट दिली आणि गरीब कष्टकऱ्यांना अन्नाचे वाटप केले. यावेळी कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, उद्योजक दिंकेश तिलवानी, रिक्षा संघटनेचे तुषार लांडगे, लक्ष्मण शेलार आदी उपस्थित होते.
महेश लांडगे यांनी शहरातील रिक्षाचालक, फेरीवाले, बांधकाम मजूर या सर्व कष्टकरी जनतेचे कोरोनामुळे हाल होत आहेत. त्यांना आपण कोणत्या प्रकारे मदत केली पाहिजे. यासाठी काय उपाययोजना राबविल्या पाहिजे. याबाबतची सविस्तर माहिती कष्टकरी कामगार पंचायत कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली. त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि गोरगरिबांच्या समस्या सोडवून त्यांच्यासाठी योग्य त्या उपयोजना करू असे आश्वासन दिले.