- ऑनलाईन अभ्यासक्रम, ऑडियो, व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे. २०२०) :- कोरोना विषाणूमुळे देशासह राज्यात व पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे इतर क्षेत्रांबरोबरच शासनाने शाळा, कॉलेज व विविध शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी चिखलीतील आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेचा शिक्षकवर्ग व प्रशासकीय व्यवस्थापन यांनी कॉलेजमधील एक हजार विद्यार्थी व त्यांच्या पालकांना तसेच आजूबाजूच्या परिसरातील पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्याना गेल्या १ महिन्यापासून फोन करून, कोरोनाविषयी जनजागृतीचा संदेश देऊन, त्यासंदर्भात सतर्क कसे राहिले पाहिजे, या विषयी मार्गदर्शन केले. त्यामुळे पालकांचाही या कार्याला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. या परिस्थितीमध्येही संस्था विद्यार्थ्यांच्या कायम संपर्कात राहत आहे. विद्यार्थ्यांची काळजी घेत आहेत, असे कौतुक संस्थेच्या सर्व शिक्षक व प्रशासकीय वर्गाचे विद्यार्थ्यांचे पालक करीत आहेत.
कोरोनामुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून मागे राहू नये किंवा त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आयआयबीएम संस्था विविध पद्धतीने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने क्लास घेऊन, त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे. विद्यार्थ्यांची ऑडियो, व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धा तसेच त्यांना ऑनलाइन अभ्यासक्रम समजावून सांगणे अशा विविध मार्गाने विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहे व विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेत आहे.
याकामी संचालक राम रैना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय विभाग प्रमुख अमोल भागवत, शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. तेजस्विनी गायकवाड यांच्या नियोजनातून शिक्षकवर्ग व प्रशासकीय व्यवस्थेकडून काळजीपूर्वक शैक्षणिक उपक्रम राबविला जात आहे व यापुढेही अश्याच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून त्यांना मार्गदर्शन केले जाईल. यासाठी संस्था विविध पद्धतीने कायमस्वरूपी प्रयत्नशील राहील, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर यांनी सांगितले.


















