न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२०) :- रिक्षाचालक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील कणा आहे. सार्वजनिक व्यवस्थेमध्ये योगदान देणाऱ्या रिक्षाचालकांचा व्यवसाय बंद आहेत. अशा अवस्थेत त्यांना उपाशी मरु देणार नाही. त्यांना लवकरच अन्नधान्याची व्यवस्था करण्यात येईल आणि अन्न धान्याचे किट वाटप करण्यात येईल. तसेच इतर गोरगरीब कष्टकरी जनतेसाठीच्या जेवण आणि अन्नधान्याची व्यवस्था करायचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार अण्णा बनसोडे म्हणाले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने पिंपरी येथे अन्नछत्र सुरू करण्यात आले असून, या ठिकाणी रोज दोन हजार व्यक्तींना चपाती, भाजी, भात, वरण असे दोन वेळचे जेवण दिले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा उपक्रम सुरू असून अन्नछत्राची साफसफाई, कोरोनापासून घेण्यात येणारी काळजी, सोशल डिस्टन्सचे होणारे पालन, अन्नाचा अत्यंत उत्तम दर्जा, याबाबत सर्वत्र कौतुक होत असून एक आदर्श अन्नछत्र म्हणून हे अन्नछत्र उदयास येत आहे. या अन्नछत्रास पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी भेट दिली आणि गोरगरीब कष्टकऱ्यांना जेवण वाटप केले. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, पंचायत सल्लागार बबन मिसाळ, फिरोज पाटील, शफी शेख आदी उपस्थित होते.
अण्णा बनसोडे यांनी उपस्थित रिक्षाचालकांची विचारपूस केली. रिक्षा बंद असल्यामुळे कुटुंबांचा गुजारा कसा होतो, काय अडचणी येत आहेत, याबाबत माहिती घेतली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने रिक्षा चालकांना ५००० रुपये आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली असून लवकरच उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून, हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन अण्णा बनसोडे रिक्षाचालकांना यावेळी दिले.















