न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२०) :- चिंचवडगावातील गांधीपेठ परिसरात आज बुधवारी रस्त्यावर अनधिकृतपणे अतिक्रमण करणाऱ्या भाजीपाला आणि फळे विक्रेत्यांवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून धडक जप्तीची कारवाई करीत, हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात लाॅकडाऊन सुरू आहे. शहरातील सर्व दुकाने बंद असताना जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांशिवाय भाजीपाला, फळभाज्या यांचे विक्रीसाठी महापालिकेने शहरातील ठराविक भागात विक्रीकेंद्र सुरु केले आहे. त्यसाठी मनपा प्रशासनाने परवानगी दिली आहे.
याचा गैरफायदा घेत भाजीपाला, फळभाज्या व्यापाऱ्यांनी शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला मोक्याच्या ठिकाणी अनाधिकृतपणे आपली दुकानं सुरु केली होती. या ठिकाणी ग्राहकांची विनाकारण गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. काही नागरिक तोंडाला मास्क न लावताच खरेदीच्या नावाखाली भटकत होते. त्यामुळे महापालिकेच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.















