न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२०) :- करोनाच्या संकटामुळे २१ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २२ मार्चपासून शहरातील संपूर्ण औद्योगिक क्षेत्राची चाके थांबली होती. लॉकडाऊन तीनमध्ये अत्यावश्यक सेवांमधील उत्पादनाला परवागी देण्यात आली होती. मात्र इतर व्यवसाय, उद्योग बंदच होते. मागील आठवड्यामध्ये राज्य शासनाने काही अटी व शर्तींवर उद्योग सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. शहरात छोटे-मोठ्या मिळून किमान दहा हजारांहून अधिक कंपन्या आहेत. यामध्ये ४ ते ५ लाख कामगार काम करत आहेत. या सर्वांवरच मोठे संकट गेल्या दोन महिन्यांपासून ओढावले होते.
उद्योगनगरीत सर्व उद्योग पूर्ववत सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वारंवार मागणी केली जात होती. त्यानंतर राज्य सरकारने ३३ टक्के उद्योगांना काही अटी व शर्तींवर कंपन्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतरही यामध्ये सुधारणा करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली होती.
यावर वन महसूल आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसन विभागातर्फे व मुख्य सचिव यांच्या आदेशान्वये १९ मे २०२० रोजी रिवाईज गाईडलाईन देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील उद्योगांना रेडझोन मधून बाहेर काढले असून, नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे उद्योगांचे ३३% टक्के मॅनपावरचा नियमही निघून जाईल. त्यामुळे उद्योगनगरीचे उद्योगांची थांबलेली धडधड पुन्हा पूर्ववत होईल. पिंपरी-चिंचवड हद्दीतील उद्योगांना रेडझोन मधून बाहेर काढल्यामुळे दिलासा मिळणार आहे, असे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.















