न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२०) :- करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन ४.० लागू करण्यात आला आहे. राज्य सरकारने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. रेडझोन वगळता इतर झोनमध्ये नव्या नियमावलीत लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली अहे. या नियमावलीत पिंपरी-चिंचवड महापालिकेला रेड झोनमधून वगळण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी २२ तारखेपासून या नियमावलीनुसार शहरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही नियमावली २२ ते ३१ मे पर्यंत लागू असणार आहे. नवीन नियमावलीनुसार जी शहरे रेड झोन म्हणून घोषित केली आहेत. त्यात पिंपरी – चिंचवड शहराचे नाव नाही. रुग्ण वाढत असतानाही शहर नॉन रेडझोन कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर महापालिका आयुक्तांनी प्रकाशझोत टाकला आहे.
याबाबत माहिती देताना आयुक्त म्हणाले की, शासनाने रेडझोन आणि नॉन रेडझोन असे दोनच झोन निश्चित केले आहेत. शहरातील रुग्ण वाढीचा वेग कमी झाला होता. त्यामुळे ग्रीन झोन न म्हणता पिंपरी – चिंचवड शहराला ‘ नॉन रेडझोन ‘ म्हटले आहे. रेडझोन घोषित केले नाही. दोन दिवसांपासून शहरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहराला नॉन रेडझोन’ मधून वगळण्याबाबत चर्चा झाली आहे.
शहरात शनिवापर्यंत रुग्ण वाढीचा दर कमी होता. परिस्थिती नियंत्रणात होती. पण, शहरात पुन्हा रविवारनंतर रुग्ण संख्येत वाढ सुरु झाली. सरकारने त्यापुर्वीच झोन निश्चित केले होते. दोन दिवसात किती रुग्ण वाढतात. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. तसेच शहराला ‘ रेडझोन’मधून वगळू नये यासाठी सरकारकडे विनंती करण्याबाबत मी आत्ता काहीच सांगू शकत नाही. रुग्ण वाढीचा वेग पाहून चर्चा केली जाईल. पण, शहर शुक्रवार ( दि. २२) मध्यरात्रीपर्यंत रेडझोनमध्येच असून जुनेच नियम लागू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.