न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२०) :- पिंपरी – चिंचवड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज सोमवारपासून (दि. १८) सुरु झाले. मात्र, नवीन वाहन नोंदणी आणि अवजड वाहनांचे ई – पास या दोनच सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. इतर सेवा अद्याप सुरु करण्यात आलेल्या नाहीत.
दोन दिवसांत जवळपास ५८ वाहनांची नोंद झाल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली. आरटीओने वाहन नोंदणी १८ मार्चनंतर पूर्णपणे बंद ठेवली होती. त्यानंतर केवळ ई – पासचे काम सुरु होते. मात्र , राज्य शासनाकडून आलेल्या आदेशानुसार काही परिसरातील ‘ आरटीओ’ चे कामकाज सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार १८ मे पासून म्हणजे जवळपास दोन महिन्यानंतर वाहन नोंदणी पुन्हा सुरु झाली आहे.
सोमवारी नोंदणी सुरु झाली त्यावेळी १३ वाहनांची नोंद झाली. तर, मंगळवारी त्यात आणखी ४५ वाहनांची भर पडली आहे. या व्यतीरिक्त इतर कोणतीही सेवा सुरु करण्यात आलेली नाही. सध्या कार्यालयात केवळ दहा टक्के कर्मचारी उपलब्ध आहेत. दरम्यान , ‘ आरटीओ कार्यालय खुले झाल्याची माहिती कळाल्याने अनेकांनी विविध कारणांसाठी कार्यालयात गर्दी केली. अडवलेली वाहने, पास संदर्भात विचारपूस, इतर राज्यातील चालक हे आरटीओ कार्यालयासमोर गर्दी करु लागले आहेत. सध्या केवळ वाहन नोंदणीचे काम पर सुरु असल्याने नागरिकांनी गर्दी करु नये, असे आवाहन आरटीओने केले आहे.















