- भाजपसह शहरातील दोन्ही आमदारांवर शिवसेनेच्या शहर प्रमुखांनी डागली तोफ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२०) :- मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेला सोबत घेऊन कोरोना महामारीशी यशस्वीपणे दोन हात करीत असताना, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांकडून मात्र कोरोनाचे राजकारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाआघाडी सरकारला आलेले यश महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना खुपत आहे.
२० मे २०२० अखेर भारतात कोरोना बाधितांची संख्या सुमारे १ लाख ५ हजार इतकी होती, त्यातमुंबई आणि महाराष्ट्रात ३५००० हजार कोरोना बाधित होते. अमेरिका, इटली, ब्रिटन सारख्या देशांमध्ये १ लाखाचा आकडा गाठण्यासाठी ४०-४३ दिवस लागले असताना, भारतानेलॉकडाऊन केल्यामुळे, कोरोनाच्या प्रसाराला अटकाव घालत १ लाखाचा आकडा गाठण्यासाठी ७० दिवस घेतले. WHO आणि तज्ञांकडून मे अखेर भारतात कोरोना बाधितांचा आकडा हा काही लाख नाही तर करोडोत असेल असे जे भाकीत केले होते ते भारताने खोटे ठरविले. फक्त मुंबईतच मे अखेर कोरोना बाधितांची संख्या ही लाखोंच्या घरात असेल असे तज्ञांनी अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात मात्र २० मे अखेर मुंबईत कोरोना बाधितांची संख्या ३० हजार होती. प्रसिद्धी माध्यमातून गेल्या २ दिवसांपासून प्रदर्शित होणारी आकडेवारी लक्षात घेतल्यास, महाराष्ट्राचा कोरोना वाढीचा दर १.३२ असून देशाच्या १.६१ या सरासरी वाढीच्या दरापेक्षा तो कमी आहे. महाराष्ट्रात कोरोना पासून बरे झालेल्या पेशंटची संख्या सर्वाधिक असून देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. जर देशात कोरोनाला अटकाव करण्यात केंद्र शासनाला यश आले असेल तर मुंबई आणि महाराष्ट्राचे पर्यायाने महाआघाडी सरकारचे त्या यशात योगदान नाही का ?
पिंपरीचिंचवड मधील भाजपाचे दोन्ही आमदार आणि पदाधिकारी यांनी तहसीलदारांना राज्य सरकार विरोधात निवेदन दिले आहे. त्यात राज्य सरकारने सामान्य जनतेसाठी आर्थिक पॅकेज जाहीर न केल्याबद्दल टीका केली आहे. महात्मा फुले कर्ज माफी योजनेखाली शेतकऱ्यांचे ३० हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केल्यानंतर लगेचच महाराष्ट्रासमोर कोरोनाचे संकट उभे राहिले. एकाबाजूने मार्च अखेर केंद्र शासनाकडे २४ हजार कोटी थकले असताना दुसरीकडे महसूल पूर्णपणे थांबल्याने राज्य सरकार आर्थिक संकटात सापडले. महाराष्ट्र सरकारचा स्वतःचा महसुली खर्च प्रति महिना १२ हजार कोटी आहे. आपण महाराष्ट्राचे विधिमंडळ सदस्य आहात. आपण या संदर्भात महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी केंद्र सरकार ने महाराष्ट्राला भरीव निधी द्यावा यासाठी प्रयत्न करावेत म्हणून निवेदन का नाही दिले ?
पीपीई किट्स, व्हेनटीलेटर्स या करिता महाराष्ट्र सरकारला निधीची आवशकता असताना,मुख्यमंत्री सहाय्यता निधी ऐवजी, भाजपा विधिमंडळ सदस्यांनी प्रधानमंत्री कोरोना निधीला मदत केली, याबद्दल शिवरायांच्या जन्मभूमीतील महाराष्ट्राचे विधिमंडळ सदस्य म्हणून आपली भूमिका जाहीर करावी ?
महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने रेशनिंग चे धान्य फक्त लाभार्त्यांनाच नाही तर सामान्य जनतेला स्वस्त दरात उपलब्ध करून दिले. मे आणि जून महिन्याचे धान्य वाटप मार्च महिन्या पासून सुरु केले. एकट्या पुणे जिल्ह्यात ८ लाख अतिरिक्त कार्ड धारकांना आणि ३२ लाख लोकांना याचा फायदा देण्यात आला. स्वस्त दर योजनेचा फायदा नव्हता तर पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचे नगरसेवक “ शिफारस असेल तरच रेशनिंग धान्य मिळेल “ असा खोटे श्रेय लाटण्याचा प्रयत्न का करीत होते ?
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असताना, कोरोना सारखे संकट देशासमोर असताना, IFC सारखी महत्वाची आर्थिक अस्थापना कुठलेही निकष न वापरता गांधीनगर, गुजरातला हलविण्यात आली. मुंबई आणि महाराष्ट्राचे खच्चीकरण आणि महत्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेल्या या पाउलाचे आपण समर्थन करता का ? पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपा ची सत्ता आहे. दोन्ही शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे, याला सत्ताधारी भाजपाला जवाबदार धरायचे का? भाजपा नियुक्त राज्यपालांनी विधान परिषदेची निवडणूक शिफारस केली. निवडणूक टाळून, मतदानाचा घोडेबाजार होऊ न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ती बिनविरोध केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासमोर कोरोनाचे संकट असताना कोणतेही राजकीय भाष्य न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकार, एकाबाजूला उद्योगधंदे, व्यापार सुरु करून, महाराष्ट्र पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची आकडेवारी देशात कशी सर्वाधिक आहे, सामान्य जनतेला सरकारने कसे वाऱ्यावर सोडून दिले आहे. केरळसारख्या राज्यांनी कोरोनाचा कशाप्रकारे अटकाव केला आहे, अशा गैरलागू तुलना / टिका करून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचा डाव महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी, २२ मे ला आंदोलन घेऊन आखला आहे, असा आरोप भाजपवर शिवसेना पिंपरी चिंचवड शहरप्रमुख योगेश बाबर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.















