न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने लॉकडाऊनच्या नियमामध्ये शिथिलता आणून दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. जास्त गर्दी होत असलेल्या आणि बाजारपेठ परिसरातील दुकानांना सम व विषम पद्धतीने खुले करण्यास सांगितले होते. दरम्यान, पिंपरी बाजारपेठेतीलही दुकाने खुली झाली. मात्र, या परिसरातील वाढत्या रुग्णांची संख्या, महापालिकेकडून जाहीर केलेला कंटेन्मेंट झोन आणि होणारी गर्दी यामुळे बाजारपेठेतील दुकाने रविवारी (दि. २७) पोलिसांनी पुन्हा बंद करण्यास सांगितली.
पिंपरी महापालिका आयुक्तांनी शहरातील दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. त्यासाठी वेळही ठरवून दिली. मात्र, रविवार आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पिंपरी, चिंचवडसह विविध बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने कोरोनाची चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्यातच रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन पोलिसांनी या भागातील दुकाने पुन्हा बंद करण्यास सांगितले.
पिंपरी परिसरात कोरोना संशयित रुग्णांची संख्या वाढत गेल्याने तसेच, होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने या परिसरातील सर्व दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगितले. दरम्यान, आधीच गेल्या दोन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने तोटा सहन कराव्या लागलेल्या दुकानदारांना पुन्हा दुकाने बंद करावी लागली. आता पुढील आठ दिवस तरी त्यांना दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत.













