न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात राहणाऱ्या शिवदर्शन उर्फ शिवतेज नेताजी चव्हाण वय-२५ याने सैराट फेम आकाश ठोसर याच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले होते. महिलेशी आरोपी हा आकाश म्हणून फेसबुकद्वारे चॅटिंग करायचा. या बनावट खात्याद्वारे त्याने अनेक महिला आणि तरुणींना आपल्या जाळ्यात ओढले असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अहमदनगर येथील एका महिलेचा विश्वास संपादन करून सोन्याचे दागिने गरजेपोटी मागितले. ते परत करतो असेही सांगितले. माझा मित्र दागिने घ्यायला येईल, असे त्याने चॅटिंगद्वारे सांगितले. अहमदनगर येथून त्या महिलेकडून एक लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेतले आणि परत तो पिंपरी-चिंचवड शहरात आला.
काही दिवसांनंतर संबंधित महिलेला आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर तिने अहमदनगर येथील सायबर पोलिसात तक्रार केली. त्यानुसार सायबर पोलिसांनी कसून तपास करत आरोपीचा शोध घेतला. सायबर पोलिसातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरूण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी येथून आरोपीला अटक केली आहे.


















