न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२०) :- आनंदनगरमधील नागरिकांना निगडीतील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या महाविद्यालयात क्वारंटाईन करण्याच्या महापालिकेच्या निर्णयास स्थानिक नगरसेवकांनी विरोध केला. मागील तीन-चार दिवसांपासून प्रत्यक्ष रस्यावर उतरून हा विरोध सुरू होता. त्यामुळे पोलिसांनी नगरसेवकांना आज (दि. २६) रोजी ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रवादी नगरसेवक शरद दत्ताराम मिसाळ उर्फ राजू मिसाळ, शिवसेना नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांच्यासह योगेश बाळकृष्ण जाधव, निलेश अनिल जांभळे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी फौजदारी दंड संहिता १९७३ चे कलम १४९ अन्वये नगरसेवकांना नोटीसा दिल्या आहेत.
आनंदनगरमधील नागरिकांना त्याच परिसरातच क्वारंटाईन करावे. आमच्या ग्रीनझोन मध्ये तेथील नागरिकांना क्वारंटाईन करु नये. प्रभागातील नागरिकांना त्याचा धोक निर्माण होईल. प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध करत नगरसेवकांनी चक्क रात्र रस्त्यावर काढली होती. शहरातील एका भागातील ही अडचण नाही. सर्वच ठिकाणच्या नागरिकांनी विरोध करायचे ठरवले. तर कसे होईल, अशा स्वरुपाची भुमिका कोणत्याही नागरिकांनी घेवू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले होते.















