न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी असलेली ठिकाण बंद करण्यात आली आहेत. तर, इतर बाजारपेठेत सम व विषम तारखेस दुकाने उघडण्यास मुभा आहे. चिंचवड गावातील मुख्य बाजार रस्त्यावर अडथळे निर्माण करून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र याला विरोध झाल्याने सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी नुकतीच पाहणी केली. सहायक आयुक्त संदीप खोत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र जाधव व क्षेत्रीय अधिकारी प्रभावती गाडेकर उपस्थित होते.
चिंचवडगावातील बाजार पेठेत होणारी गर्दी पाहता परिस्थिती गंभीर असल्याने पालिका प्रशासन व स्थानिक नागरिकांनी याबाबत दक्षता घेण्याची विनंती केली होती. गांधीपेठ, पडवळ आळी, भोई आळी,चापेकर चौक, पॉवरहाऊस चौक या भागातील रस्त्यांवर बॅरिकेडस लावण्यात आले होते. येथील बाजार पेठेत दुकानदारांना सम, विषम तारखेस दुकाने उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, दुकानदार याचे पालन करत नसल्याने ग्राहकांची गर्दी वाढत होती.
रेड झोनमधील भाजीविक्रेते व ग्राहकांचा वावर भागात होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. वाहतूक कमी करण्यासाठी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात येतील. कोणतीही वाहने येणार नाहीत अशी व्यवस्था करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पवार यांनी दिली आहे.