न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२०) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांत ‘पल्स ऑक्सी मीटर’ आणि ‘थर्मल स्कॅनर’ मशीन देण्यात आली आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांची दिवसभरात दोनदा या मशीनद्वारे तपास करण्यात येणार आहे. तपासणीनंतर सर्व पोलिसांच्या शरीराचे तापमान ऑक्सिजन पातळीच्या नोंदी रजिस्टरमध्ये घेण्यात येणार आहेत.
पोलिसांनी ड्यूटीवर असताना एन ९५ किंवा तीन पदरी मास्क, फेसशिल्डचा आणि सॅनिटायझरचा वापर करावा. प्रत्यक्ष अटक करणाऱ्या व संशियत आरोपीची अंगझडती घेणाऱ्या पोलिसांनी पीपीई किट परिधान करावे. अटक करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावे. आरोपी अटक करण्यापूर्वी त्याची थर्मल स्कॅनर व ऑक्सिमीटरने तपासणी करावी. आरोपी अटक केल्यानंतर त्याची तत्काळ वैद्यकीय तपासणी करावी.
आरोपी अटक केल्यानंतर त्याच्या हाताला लांब दोर बांधून सुरक्षित अंतर ठेवावे. हा दोर वेळोवेळी सॅनिटायझींग करावा. आरोपीला देखील मास्क द्यावे. आरोपी ठेवण्यात येणाऱ्या लॉकमध्ये सोशल डिस्टनिंगचे मार्किंग असावे. आरोपीकडे तपास करताना सुरक्षित अंतर ठेवावे. प्रत्यक्ष स्पर्श टाळावा. तपास खोलीमध्ये हवा खेळती हवी, अशी मार्गदर्शक नियमावली पोलीस आयुक्तांनी पोलिसांसाठी तयार केली आहे.