न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने आळंदी व दिघी रस्त्यावरील संत तुकाराम नगर येथील डॉ. आंबेडकर गार्डन समोरील सर्व्हे नं. २१४, आरक्षण क्रं. ४०१ मधील काही एकर जागा रुग्णालय उभारण्याकामी सुमारे १५ वर्षांपूर्वीच आरक्षित केलेली आहे. तसा सूचना फलकही तेथे लावण्यात आलेला आहे.
या ठिकाणी किमान ८ ते १० मजली रुग्णालय व पार्किंगची महापालिकेने उभारणी करावी. जेणेकरून परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील. त्यासाठी महापालिकेने रुग्णालय उभारण्याकामी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने, पारदर्शकपणे पूर्ण करावी, ज्यादा एफएसआय मंजूर करावा व रुग्णालयाचे काम तातडीने सुरु करावे.
तसेच महापालिकेने भोसरी स्मशानभूमीजवळ बांधलेल्या व खासगीकरणाच्या वादात अडकलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची उंची खूपच कमी आहे. त्यासाठीही ज्यादा एफएसआय मंजूर करून रुग्णालयाची उंची वाढवावी व त्याचे खासगीकरण न करता पालिकेने स्वतः ते जनहितासाठी चालवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे


















