- पवना, इंद्रायणी व मुळा नदी सुधारसाठी अभ्यास समिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवारी (दि. १) रोजी दुपारी दोन वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सभागृहात प्रत्यक्ष व व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नगरसेवकांनी उपस्थित राहून सभेला हजेरी लावली. सभेत धन्वंतरी स्वास्थ्य योजना बंद करून वैद्यकीय विमा योजना लागू करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली.
महापालिका सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी एक सप्टेंबर २०१५ पासून धन्वंतरी स्वास्थ्य योजना सुरू आहे. ती बंद करून वैद्यकीय विमा योजना लागू करण्याचा विषय मंजुरीसाठी होता. तो ३७ विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे सदस्याचा विमा योजनेस विरोध होता. यात सात कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे योगेश बहल यांनी केला. गोधळ वाढल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात सत्ताधारी भाजपच्या बाजूने कौल मिळाला.
धन्वंतरीमध्ये दरवर्षी अंदाजे २० कोटीपर्यंतचा खर्च होत असल्याने निविदा पध्दतीने मध्यस्थाची नेमणूक करुन त्यांचेमार्फत विमा कंपन्यांना धन्वंतरी योजनेच्या धर्तीवर विमा सुविधा पुरविणेकामी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल प्रसिध्द करणेत आलेले होते.
तसेच पवना, इंद्रायणी व मुळा नदी सुधार योजनेअंतर्गत कोणती कामे करण्याचे नियोजन आहे? राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान कसे मिळणार? मलनिस्सारण केन्द्र किती? राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान कसे मिळणार? राष्ट्रवादीचे दत्ता साने व भाऊसाहेब भोईर यांनी काही उपप्रश्न उपस्थित केले. भाजप नगरसेवक एकनाथ पवार यांनी अभ्यास समिती नियुक्त करण्याची मागणी केली. त्यानुसार समिती नियुक्त करण्याचा आदेश महापौर उषा ढोरे यांनी दिला.