- चालू आर्थिक वर्षात नवीन प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह…?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२०) :- कोरोनामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पाला अद्याप सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळालेली नाही. आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात अर्थसंकल्पाची अमंलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी आज सोमवारी (दि. १) रोजी दुपारी दोन वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली होती.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे यांच्या उपस्थितीत सभागृहात प्रत्यक्ष व व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नगरसेवकांनी उपस्थित राहून सोमवारी सभेला हजेरी लावली. कोरोना व लॉकडाउनमुळे शहराचे अर्थकारण बदलले आहे. त्यामुळे पुढील परिस्थिती पाहून कदाचित महापालिकेचा नवीन अर्थसंकल्प मागावा लागणार आहे. स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील ३३ टक्केच खर्च करावा लागणार आहे, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले.
भविष्यातील उत्पन्नाचा आराखडा पाहून व परिस्थितीत बदल झाल्यास नवीन अर्थसंकल्प माडावा लागणार आहे. आस्थापना वगळून ३३ टक्के खर्च करायचा आहे. नवीन कामे सुरू करता येणार नाहीत. आरोग्य व वैद्यकीय बाबीवर खर्च करावा लागेल. पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात नवीन प्रकल्प होणार की, नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.