न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जून २०२०) :- कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या, त्यांच्यावरील उपचार आणि बळींची संख्या, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला परिसर आणि व्यक्तींबाबत खोटी माहिती सोशल मीडियावर पसरवली जात आहे. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण तयार होत आहे. सोशल मीडिया, एसएमएस, व्हाट्स अप, फेसबुक, ट्विटर, टिकटॉक, हॅलो, टेलिग्राम, अन्य डिजिटल माध्यमांमध्ये प्रक्षोभक व आक्षेपार्ह माहिती पसरवू नये. सोशल मीडियावरील ग्रुपवरून प्रसारित झाल्यास ग्रुप अॅडमिन, वैयक्तिक अकाउंटवरून प्रसारित झाल्यास संबंधित व्यक्तीला जबाबदार धरून भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कारवाई केली जाणार आहे.
आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३१ (१) (३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश २ ते १५ जून या कालावधीत लागू राहणार आहेत. ३ जून रोजी धर्मवीर संभाजी महाराज जयंती, ४ जून रोजी शिवराज्याभिषेकोत्सव दिन, ५ जून रोजी वटपौर्णिमा, ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा (किल्ले रायगड), १२ जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान-देहू, १३ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान-आळंदी, १४ जून रोजी राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी असे सण उत्सव आहेत. याशिवाय शहारात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद पुकारणे, उपोषण यांसारखी आंदोलने केली जातात. पुढील १४ दिवस आंदोलनांसह कोणतीही घातक कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.
कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर बाळगणे, दगड, शस्त्रे, सोडायची अस्त्रे, फेकायची हत्यारे, साधने, काचेचे तुकडे, काचेच्या रिकाम्या बाटल्या बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे, शस्त्रे, सोटे, भाले, चाकू, सुरा, कोयता, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका, शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर बाळगणे, कोणत्याही व्यक्तीचे, चित्राचे, प्रतीकात्मक प्रेताचे, पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठमोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजवणे, सभ्यता, नीतिमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल, राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे. कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी आहे. पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास, पोलीस आयुक्तांच्या परवानगीशिवाय सभा घेणे, मिरवणूक काढणे यावर बंदी आहे. यासह आदी कारणांसाठी पुढील १४ दिवस बंदी राहणार आहे, असा आदेश पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी काढला आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेला आदेश १ जून ते ३० जून या कालावधीत लागू राहणार आहे.


















