न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जून २०२०) :- गेल्या दोन दिवसांमध्ये निसर्ग वादळामुळे शहरात जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळित झाले. त्यातच अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर झाडे पडल्यामुळे वाहतुकीला ही अडथळा निर्माण झाला होता, अश्या वातावरणातही आज प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण प्रेमींनी प्राधिकरण व वाल्हेकरवाडी परिसरात सहा झाडांना जीवदान दिले. तसेच रस्त्यावरील पडलेली झाडे हटविण्यास स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला, त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय मुनोत,संदीप सकपाळ,मंगेश घाग, संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी यांनी प्राधिकरण सेक्टर २७ तसेच स्वप्ननगरी परिसर वाल्हेकरवाडी येथे सदरच्या झाडांना पुन्हा सुस्थितीत पुनोर्रोपीत केले. अशोक, बेल, फणस आणि गुलमोहर च्या झाडांना त्यामुळे जीवदान मिळाले
या प्रसंगी पर्यावरण अभ्यासक विजय मुनोत म्हणाले,” पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्राधिकरण परिसरामध्ये झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, सुनियोजित नगररचनेमुळे प्राधिकरणास हरित उपनगर म्हणूनही संबोधले जाते.कालच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक रस्ता दुभाजकातील झाडे उन्मळून पडली त्यातील सहा झाडे समितीच्या सदस्यांनी सुनियोजित पद्धतीने पुनोर्रोपित करण्यात यश मिळवले.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” रस्ता दुभाजक मध्ये लावण्यात आलेली फायकस जातीचे झाडे व गुलमोहर विदेशी प्रजातिची झाडे मोठया प्रमाणात उन्मळून पडल्याचे प्राधिकरण परिसरात दिसून आले. पर्यावरण पूरक असलेली काही देशी प्रजातीची झाडे पुन्हा पुनोर्रोपित करण्यात समिती सदस्यांना आज यश आले.तसेच वाल्हेकरवाडी रस्त्यावर दोन झाडे उन्मळून पडली होती स्वसंयंसेवकांच्या मदतीने सदरचे झाडे रस्त्याच्या कडेला सरकावून वाहतूक सुरळीत करण्यास मदत झाली.














